औंध – बाणेर मुख्य रस्त्यावर पुणे महापालिकेतर्फे अनधिकृत बांधकामे व दुकानांपुढे बांधण्यात आलेल्या शेडवर तसेच विद्युत खांबांवरील अनधिकृत केबलवर कारवाई करण्यात आली. एकूण 600 कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. सकाळपासूनच चालू असलेली ही कारवाई संध्याकाळी साडेसहा नंतरही सुरू असल्याचे दिसून आले.
पुणे महापालिकेचे बांधकाम विभाग, पथविभाग, विद्युत विभाग तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पुणे शहरामध्ये 15 रस्ते महापालिकेतर्फे विकसित करण्यात येत आहे, यामध्ये बाणेर रस्त्याची निवड करण्यात आली आहे. याचे काम सुरू करण्यासाठी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर जेसीबी, गॅस कटरच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.
बाणेर गावठाण हद्दीमध्ये या कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. कोणत्याही पद्धतीने नोटीस न देता ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. भारतीय जनता पक्षाचे ओबीसी राज्य सरचिटणीस प्रल्हाद सायकर तसेच स्थानिक नागरिकांनी जेसीबी समोर बसून या कारवाईस विरोध केला.
पुन्हा अनधिकृत केबल
रस्त्यावरील विद्युत खांबावरील 15000 मीटर अनधिकृत केबल या कारवाईत काढून टाकण्यात आल्या तसेच दोन वाहने विद्युत विभागामार्फत जप्त करण्यात आली. परंतु, ही कारवाई चालू असतानाच कर्मचाऱ्यांनी पुढे केबल कापल्यानंतर मागोमाग लगेच इंटरनेट व्यवसायिकांनी केबल पुन्हा त्याच खांबांवर टाकल्या.
कारवाईत दुजाभाव…
बाणेर प्रमुख रस्त्याला अतिक्रमण कारवाई चालू असताना काही ठिकाणी दुजाभाव केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. सायकर चौकातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी शेजारील दुकानांवर कारवाई करण्यात आली. परंतु, त्या अधिकाऱ्याच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला. बालेवाडी फाटा शेजारील एलिफंट हॉटेल शेजारील सर्व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. परंतु, एलिफंट हॉटेलला मात्र अभय देण्यात आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.