पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील ड्रेनेजलाइन व पावसाळ्यापूर्वीची कामे शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केला होता. परंतु शहरातील ड्रेनेजलाइनची साफसफाई संबंधित विभाग व ठेकेदाराने कशा पद्धतीने केली आहे याची प्रचिती शहरवासीयांना पावसाळ्यात आली. पण डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या प्रशासनाला जाग न आल्याने शनिवारी(दि. 14) अक्षरशः महापालिकेच्या समोरच ड्रेनेजलाइन तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर मैलामिश्रित पाणी महामार्गावरून वाहत आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइन सफाईची झालेल्या कामांचा चक्क प्रशासनाला आरसा दाखवल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आऊटगेटजवळ आणि मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ तसेच पीएमपी बस स्थानकाच्या शेजारी मागील काही दिवसांपासून सातत्याने ड्रेनेजलाइन तुंबत आहे. ड्रेनेजलाइन तुंबल्याने मैलामिश्रित पाणी मोठ्या प्रमाणावर महामार्गावरून वाहत आहे. ही परिस्थिती महापालिकेच्या समोरच उद्भवली असल्याने महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून शहरातील विविध प्रभागांमध्ये काय परिस्थिती असू शकते याचा अंदाज महापालिकेच्या आयुक्तांनी बांधणे गरजेचे आहे.
महापालिके समोर मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने ड्रेनेजलाइन तुंबत आहे. जर महापालिकेच्या आवारातच अशी परिस्थिती उद्भवत असेल तर इतर ठिकाणी सर्व सावळा गोंधळच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाला याचा जाब विचारून शहरातील ड्रेनेजलाइनच्या कामांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या परिसरात तुंबते ड्रेनेजलाइन
दापोडी, लालटोपीनगर, चिखली, मोरेवस्ती येथील साने चौक ते शिवरकर चौका दरम्यान तसेच साने चौकातील भाजी मंडई परिसर, म्हेत्रेवाडी येथील महापालिकेच्या शाळेसमोर, कस्तुरी मार्केट, कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक, पवार वस्ती तसेच महापालिका आयुक्तांच्या बंगल्याकडे जाताना पिंपरी येथील सम्राट चौकात तसेच शहरातील इतर भागांमध्ये पावसाळ्यात सातत्याने ड्रेनेजलाइन तुंबल्याने रस्त्यावरून दूषित व मैलामिश्रित पाणी वाहत होते. परंतु महापालिकेच्या संबंधित विभागाकडून केवळ तात्पुरती उपाययोजना करण्यात येत आहे. परिणामी नागरिकांच्या घरांत अक्षरशः मैलामिश्रित पाणी शिरत आहे. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने शहरातील ड्रेनेजलाइनचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.