पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे आयोजन महापालिकेकडून संपूर्ण शहरात केले जाणार आहे. त्यासाठी, पुणे महानगरपालिकेस बजाज ग्रुपकडून 5 लाख राष्ट्रध्वज नुकतेच देण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे हे ध्वज प्रातिनिधीत स्वरूपात सुपूर्द करण्यात आले.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, विलास कानडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे, बजाज फिनसर्व सीएसआर संचालन समिती अध्यक्ष शेफाली बजाज,यांच्या समेवत बजाज ग्रुप ऑफ कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हे राष्ट्रध्वजसंपूर्ण शहरात वितरीत केले जातील. स्वातंत्र्याचे 75 वे वैभवशाली वर्ष साजरे करण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा मोठा आधार ठरला आहे. बजाज ग्रुप ऑफ कंपनीने मनपाला लसीकरण मोहिमेसाठी आणि इतर आरोग्य सेवा समर्थनासाठी महामारीच्या काळात पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक गंभीर उपक्रमांमध्येसुद्धा नेहमीच पाठिंबा दिला आहे. बजाज कुटुंब हे स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंब आहे. समाजाच्या प्रगतीसाठी ते कटिबद्ध असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तर हा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असून भारतीय असल्याचा अभिमान बाळगत या दिमाखदार पर्वाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारताच्या स्वातंत्रय संग्रामात तसेच आत्मनिर्भर भारताच्या क्रांतिकारी प्रवासात सहभागी होण्याची सशक्त परंपरा बजाज ग्रुपला लाभली असल्याचे बजाजचे सीएसआर आणि ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख अजय साठे यांनी सांगितले.