13 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका आणखी वाढणार
पुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. शिवाय, तापमानात सातत्याने घट होत आहे. मंगळवारी (दि.10) देखील तापमानाचा पारा घसरुन 11.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. पुढील काही दिवस शहरातील तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
राज्यात गेल्या आठवड्यापासून थंडी सुरू झाली. मात्र, त्यावेळी कडाका थोडा कमी होता. मात्र, कोरडे हवामान झाल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत वाढ होत असून किमान तापमानातदेखील घट होत आहे. दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी पश्चिमी चक्रावात हिमालयीन भागात धडकणार आहे. त्यानंतर उत्तर भारताकडून राज्याकडे थंड हवा वाहण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यानंतर थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, शहरात पहाटे अनेक भागांमध्ये धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. या गुलाबी थंडीची अनुभूती घेण्यासाठी नागरिकही घराबाहेर पडत आहे. टेकड्या, उद्याने याठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.