फसव्या सरकारला सत्तेतून खाली खेचा

मंचर येथील सांगता सभेत दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन

मंचर- फसव्या भाजप -शिवसेना सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाआघाडीला प्रचंड मताधिक्‍याने निवडून द्यावे, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा मंचर येथील शिवाजी चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रकाश पवार, सदाशिव पवार, किरण वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, सभापती उषा कानडे, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, अरुणा थोरात, विनोद मोढवे, रुपाली जगदाळे, राष्ट्रवादी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकरचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवाजी लोंढे, सरचिटणीस शरद शिंदे, युवक अध्यक्ष निलेश थोरात, बाळासाहेब बाणखेले, वसंत भालेराव, राजू इनामदार, नाथाभाऊ शेवाळे, विठ्ठल टिंगरे, बाबासाहेब खालकर, प्रताप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, केशर पवार, सुषमा शिंदे, सरस्वती शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, आढळराव पाटील तुम्ही मला विचारतात की 30 वर्षांत काय केले? पण तुम्ही 15 वर्षांत विकासाला खीळ घालण्याशिवाय दुसरे काय केले. मतदारराजा तुम्हीच सांगा विरोधकांच्या आश्‍वासनाप्रमाणे एसइझेड, विमानतळ, पुणे- नाशिक रेल्वे धावली का? मी पाच वर्षे अवसरी खुर्द येथे एसटी आगार बांधून ठेवले आहे. त्यातून तुम्हाला एक तरी एसटी सुरू करता आली का? बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या का, या प्रश्‍नांची उत्तरे द्या? माझ्या कारकिर्दीत आंबेगाव तालुक्‍यात अभियांत्रिकी महाविद्यालय झाले की नाही, कालव्याला पाणी आले की नाही आले, भीमाशंकर कारखाना देशात उत्कृष्ट ठरला की नाही ठरला,39 गावांत वेळ नदीवर 24 बंधारे बांधले की नाही? या सर्व प्रश्‍नांना नागरिकांनी टाळ्या वाजून हो, असे उत्तर दिले. दरम्यान, साकोऱ्याचे शिवसेनेचे उपसरपंच विजय मोढवे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

  • रोजगाराची संधी
    मी निवडून आल्यावर पाच हजार युवकांना नोकऱ्या देणार, असे विरोधी उमेदवार म्हणतात. तर राजाराम बाणखेले यांना जाहीर आव्हान आहे की, तुम्ही तो रोजगार कुठे व कसा देणार याचा जाहीर खुलासा करावा. तसा खुलासा केल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईल.
  • खासदार डॉ. कोल्हेंची तोफ आज रांजणगावला धडाडणार
    आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलील वळसे पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी (दि. 19) रांजणगाव येथे होणार आहे. या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे संबोधित करणार असल्याने या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सभेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे युवानेते मानसिंग पाचुंदकर-पाटील यांनी दिली. रांजणगांव गणपती येथील एसटी बसस्थानक चौकात सकाळी 10 वाजता होणाऱ्या या महाविजय निर्धार सभेच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा उमेदवार दिलीप वळसे पाटील असणार आहेत. तरी या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाचुंदकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.