पालिकेत नियंत्रण कक्षाची स्थापना; 22 कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक
सातारा – करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सातारा शहरातील मॉल्स, चित्रपटगृहे, चौपाटी व तत्सम सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करण्यात आला असून प्रत्येकी दोन कर्मचारी तीन सत्रांमध्ये या कक्षात कार्यरत राहणार आहेत. 22 कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. साताऱ्यात करोनाच्या प्रार्दुभावापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या आवाहनानुसार करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सातारा पालिकेने तातडीची पावले उचलत उपाययोजनांची सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील चित्रपटगृहे, चौपाटी, मॉल्स व तत्सम सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, जेणेकरून संभाव्य गर्दी टाळता येईल.
शहरात 22 कर्मचाऱ्यांचे जलद प्रतिसाद पथक तयार करण्यात आले असून त्यावरील नियंत्रणासाठी एक अधिकारी व दहा कर्मचाऱ्यांची समिती राहणार आहे. पालिकेचे दीडशे कर्मचारी शहरातील वीस प्रभागांमध्ये प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून माहिती घेणार आहे. विशेषतः परदेशगमन केलेल्या व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात जंतुनाशक पावडर व धूर फवारणी तातडीने सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य समितीच्या सभापती अनिता घोरपडे यांनी आरोग्य निरीक्षकांना त्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. करोना विषाणूची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारे फलक शहरातल्या आठ ठिकाणी लावण्यात येणार आहेत. घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकावरूनही करोना विषाणूसंदर्भात माहिती दिली जात आहे. अतितातडीच्या सेवेसाठी पालिकेच्या बारनिशी कक्षालगत आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे दोन कर्मचारी समन्वयक म्हणून उपलब्ध राहणार आहेत. कोणालाही काही माहिती अथवा तातडीची मदत हवी असल्यास 02162-234076/234077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माधवी कदम व किशोर शिंदे यांनी केले.
पालिकेत दाखवले हात धुण्याचे प्रात्यक्षिक
पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, नियोजन समितीचे सभापती ज्ञानेश्वर फरांदे, पाणी पुरवठा समितीचे सभापती यशोधन नारकर, नगरसेविका आशा पंडित व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले. शंकर गोरे यांनी हात धुण्याची शास्त्रीय पद्धत दाखवली. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले.