कोपरगाव – कोपरगाव पोलीस स्टेशन इमारतीचे काम सुरू असून त्यावेळी दाखल केलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रस्ताव शासनदरबारी निधीअभावी पडून आहे, यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केवळ एका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून येथील कारभार सुरू होता, परंतू या पोलीस स्टेशनवरील वाढता ताण लक्षात घेता कोल्हे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून कोपरगाव शहर व ग्रामीण या दोन स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करून घेतली. कोपरगाव नगरपालिकेच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सध्या ग्रामीण पोलीस स्टेशन कार्यरत आहे.
शहर पोलीस स्टेशनचे कार्यालय हे अत्यंत जुन्या कालबाह्य इमारतीत सुरू होते तसेच पश्चिम बाजूस असलेली पोलीस कर्मचारी वसाहतही मोडकळीस आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोल्हे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पहिल्या फेजमध्ये सुमारे साडेतीन कोटी रूपये मंजुर झालेल्या निधीतून शहर पोलीस स्टेशन अद्ययावत इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे काम निधीअभावी रखडलेले आहे.
या कामासाठीच्या सर्व तांत्रिक व प्रशासकीय सोपस्कार पुर्ण असून केवळ निधीअभावी प्रलंबित आहे. तरी यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कोल्हे यांनी केली.