मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी सोशल मीडियावरून ‘मत दो’ चा प्रचार

‘वेटिंग फॉर वोटिंग’चा हॅशटॅग

पुणे – लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्याच्या काळात संपर्काचे महत्वाचे माध्यम बनलेल्या सोशल मीडियावरूनही “मत द्या’ चा जोरदार प्रचार सुरू असून, नागरिक म्हणून तुमची कर्तव्य पार पाडण्याची हीच वेळ असल्याने प्रत्येकाने मतदान कराच असे आवाहनही सोशल मीडियावरून केले जात आहे.

सामाजिक -राजकीय कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था आणि वैयक्तिक पातळीवर देखील नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले जात आहे. तरुणाईसहित सर्वच गटातील नागरिकांची जुळवून घेणारे महत्वाचे माध्यम असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌स ऍप, इन्स्टाग्रॅम यांसरख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतदानाबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. “एरव्ही राजकीय नेत्यांना नाव ठेवण्यासाठी पुढे येता, मत मतदानासाठी का नाही?’, “मतदान म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य’, “वोट फॉर इंडिया’, असे संदेश देत लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

विशेष म्हणजे फेसबुकसारख्या माध्यमातून तुम्हाला तुमचे उमेदवाराची माहिती, मतदान केंद्रांबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विनोदी मीम्स तयार करून नागरिकांमध्ये मतदानाबद्दल कुतुहलदेखील निर्माण केले जात आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरूणाईकडूनही “फीलिंग एक्‍सायटेड’, “वेटिंग फॉर वोटिंग’चा हॅशटॅग वापरून मतदानाबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.