तेल अविव – हमास आणि इस्रायल दरम्यान हंगामी युद्धविरामासाठी सुरू असलेल्या चर्चेत प्रगती असल्याचे या चर्चेच मध्यस्थी करणार्यांनी म्हटले आहे. गाझामद्ये मानवतावादी मदत पोचवणे आणि हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिक आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनींच्या सुटकेसाठी अल्प काळासाठी युद्धविराम घडवून आणणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. इस्रायली माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
इस्रायलच्या वॉर कॅबिनेटने त्यांच्यासमोर ठेवलेल्या प्रस्तावावर शनिवारी संध्याकाळी विचार केला. मात्र त्यांनी काय निर्णय घेतला, हे समजू शकलेले नाही. या प्रस्तावाला इस्रायलच्या वॉर कॅबिनेटने तत्वतः मान्यता दिली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी इस्रायलचे शिष्टमंडळ कतारला जाणार आहे, असे काही इस्रायली वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
या प्रस्तावासाठी अमेरिका, इजिप्त आणि कतारने पुढाकार घेतला आहे. युद्धविरामाच्या या चर्चेमध्ये सध्या तरी हमासचा कोणताही सहभाग नाही. चर्चेसाठी हमासचे वरिष्ठ राजकीय नेता इस्माईल हनिएफ गेल्या आठवड्यात कैरोमध्ये गेला होता.
पहिल्या युद्धविरामाच्यावेळी हमासच्या ज्या मागण्या होत्या, त्या हनिएफ याने अजूनही कायम ठेवल्या असल्याचेही समजते आहे. जोपर्यंत इस्रायल आपले आक्रमण संपवत नाही आणि त्या भागातून आपले सैन्य मागे घेत नाही तोपर्यंत ते इतर सर्व ओलीस सोडणार नाहीत, असे हमासने म्हटले आहे.
रफाह शहरावरील कारवाईची तयारी…
दरम्यान इस्रायलने रफाह शहरावर थेट लष्करी कारवाई करण्याची तयारी केली आहे. हे शहर इस्रायल आणि इजिप्तच्या सीमेजवळ असून युद्धामुले २.३ दशलक्ष शरणार्थ्यांनी या शहरात आश्रय घेतला आहे. इस्रायलच्या पायदळाने कारवाई केल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राच्या मदत संस्थांनी व्यक्त केली आहे.