माधव विद्वांस
कोकण रेल्वेचे जनक, समाजवादी विचारसरणीचे, अजातशत्रू प्रा. मधु दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी अहमदनगर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.एस्सी.पर्यंत झाले होते. त्यानंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथून भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ष 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेनंतर तेथे अनेक गुणवंत-नामवंत लोकांची नेमणूक केली त्यापैकी प्रा. मधु दंडवते एक होते. संस्थेच्या मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्सेसमध्ये भौतिकशास्त्र विभागप्रमुख व प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले होते.
साधी राहणी व उच्च विचारसरणीचे म्हणून दंडवते सर्वश्रुत होते. वर्ष 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि त्यांनी त्यावेळी तुरुंगवासही भोगला. गोवा मुक्ती आंदोलन तसेच संयुक्त महराष्ट्र आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. आणीबाणीच्या कालखंडातही त्यांनी 18 महिने तुरुंगवास भोगला. त्यांनी त्यांचे जीवन समाजवादी विचारसरणीस वाहून घेतले होते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाजवादी पक्षात अनेक गट निर्माण झाले.त्यात राष्ट्रीय पातळीवर प्रजासमाजवादी पक्ष व संयुक्त समाजवादी हे प्रमुख पक्ष राहिले.
वर्ष 1953 नंतर नानासाहेब गोरे यांच्या बरोबर प्रा. मधु दंडवते प्रजासमाजवादी पक्षात गेले. ते जनता पक्षात प्रजासमाजवादी पक्ष विलीन होईपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते राहिले. ते वर्ष 1970-71मध्ये प्रथम महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. वर्ष 1971च्या लोकसभा निवडणुकीत बॅ. नाथ पै यांच्या निधनामुळे ते राजापूर मतदारसंघातून उभे राहिले व निवडणूक जिंकले.
बॅ. नाथ पै यांच्या निधनानंतर त्यांनी कोकण हीच आपली कर्मभूमी मानली.अभ्यासपूर्ण, विनोदी व मर्मभेदक बोचरी टीका हे त्यांच्या संसदीय भाषणाचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर ते राजापूर मतदारसंघातून 5 वेळा निवडून गेले. वर्ष 1977 मध्ये रेल्वेमंत्री म्हणून नियुक्त झाल्यावर जनता राजवटीमध्ये त्यांनी कोकण रेल्वेची उभारणी करण्याचा संकल्प सोडला. रेल्वेमंत्री झाल्यावर रेल्वेच्या कारभारात त्यांनी सुधारणा करण्याकडे लक्ष दिले. रेल्वेतील नोकरभरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार निपटण्यासाठी त्यांनी नोकरभरतीसाठी स्वतंत्र परीक्षा मंडळाची स्थापना केली. जनता पक्ष सत्तेवरून गेल्यावरही त्यांनी सतत पाठपुरावा केला. सत्तेवर नसले तरी सुरू झालेले रेल्वेचे काम मात्र धिम्या गतीने अनेक अडचणींचा सामना करीत तरीही चालूच राहिले. मधु दंडवते यांचे वयाच्या 81व्या वर्षी दीर्घ आजाराने 12 नोव्हेंबर 2005 रोजी मुंबईत निधन झाले.