तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू
बांगलादेशच्या भेटीबाबबतही तपास सुरु
नवी दिल्ली – हिज्बूलचा कमांडर नावीद बाबू याला मोटारीतून घेवून जात असताना अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस प्रमुख दविंदर सिंगचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असावेत, असा संशय असून त्या दृष्टीने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदर सिंगने 2019मध्ये बांगलादेशला तीन वेळा भेट दिली होती. तेथे अनेक दिवस वास्तव्य केले होते. त्याच्या दोन कन्या बांगलादेशात शिकत आहेत. त्यांचे शिक्षण आयएसआयने पुरस्कृत केले असावे, असा संशय आहे. कारण, सहसा भारतीय बांगलादेशात मुलांना शिक्षणासाठी पाठवत नाहीत. मात्र दविंदर सिंगच्या बांगलादेश भेटीचा खरा उद्देश आयएसआयशी सूत्रांना भेटण्याचा असावा, अशी माहिती त्यांनी दिली.
त्याच्या बांगलादेशातील वास्तव्यात आयएसआय हस्तक त्याला भेटत असावेत असा संशय आहे. काश्मिरचे पोलीस आणि अन्य यंत्रणा दविंदर सिंग याच्या बॅंक अकाउंटचीही तपासणी करत आहेत. मात्र त्याच्या घरातून बेहिशेबी साडेसात लाख रुपये जप्त केले होते.
विशेष म्हणजे हिज्बूलचा दहशतवादी नावीद बाबू याच्यावर काश्मिर पोलिसांनी 20 लाखांचे इनाम जाहीर केले आहे. मात्र त्याला सुरक्षित सोडण्यासाठी दविंदर सिंगने 12 लाख रुपयांची लाच घेतली. त्यामुळे या लाचेची रक्कम स्वीकारली मग बक्षीस का स्वीकारले नाही, असा सवाल तपास यंत्रणांना पडला आहे.
दविंदर सिंगचे हिज्बूल वगळता जैश-ए-मोहम्मदसारख्या अन्य संघटनांशी लागेबांधे आहेत का याचा तपास यंत्रणा करत आहेत. एका पाकिस्तानी दहशतवाद्याला 1990मध्ये काश्मिर खोऱ्यातून दिल्लीत सुरक्षितपणे दविंदरने आणले होते. त्याचाही तपास करण्यात येत आहे. हाच दशहतवादी 2011च्या संसदेवरील हल्ल्यात सहभागी झाला होता. 1 जुलै 2005मध्ये बनावट चलन आणि शस्त्रास्त्रांसह अटक केलेल्या चार काश्मिरी दहशतवाद्यांना सुरक्षितपणे जाऊ दिल्याचा आरोपही दविंदरवर आहे. त्यापैकी एक अटक केलेला दहशतवादी हाजी गुलाम मोइनुद्दीन दार उर्फ झाहीद याच्याकडे वायरलेस सेट पिस्तूल देउन सुरक्षित सोडण्यासाठी दविंदरसिंगचे पत्र आहे. तपास यंत्राणंनी हे पत्र, वायरलेस हॅंडसेट आणि पिस्तूल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहे.
पोलीस आणि दहशतवाद्यांचे संबंध केवळ दविंदरसिंगपुरते मर्यादित नसावेत. त्यांत आणखी काही अधिकारी दहशतवाद्यांचे पाठीराखे असावेत, असा संशय तपास यंत्रणांना आहे. त्याची पाळेमुळे खणण्याची सुरवात दविंदर सिंगपासून करण्याची तयारी तपास यंत्रणांनी केल्याचे सुत्रांनी सांगितले.