राष्ट्रीय सुरक्षा, हवामान अंदाजात महासंगणकाचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरणार
पुणे – मिळालेल्या माहितीचे अचूक विश्लेषण करून क्षणार्धात निष्कर्ष देणाऱ्या महासंगणकातील सॉफ्टवेअर निर्मितीत पुण्यातून भरीव योगदान दिले जात आहे. आयटी हब म्हणून विश्वविख्यात असलेल्या पुण्यात भारतीय महासंगणकाचे “सॉफ्टवेअर’ निर्माण केले जात असून, पुण्यातील “सी-डॅक’ संस्थेतर्फे हे काम केले जात आहे.
सीमावर्ती भागात संपर्कासाठी वापरले जाणारे सॅटेलाइट नियंत्रित करणे, समुद्रात खोलवर तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे का, हे चक्रीवादळ पुढे कुठे प्रवास करणार आहे, ते जमिनीवर कुठे आणि कधी धडकेल, अशा असंख्य अचंबित करणाऱ्या घटनांचे अत्यंत कमी वेळेत अचूक विश्लेषण होणे गरजेचे असते. कारण, त्यावर लाखो जणांचे प्राण अवलंबून असतात. यासाठीच केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महासंगणक अभियानांतर्गत (एनएसपी) देशात लवकरच अकरा नवीन महासंगणक तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे या महासंगणकासाठी आवश्यक असणारी संगणकीय यंत्रणा ही पुण्यातील “सी-डॅक’ संस्थेतर्फे विकसित केली जात असून, सध्या महासंगणकाच्या मदरबोर्डसंदर्भातील चाचणीचे काम सुरू आहे.
संगणक तंत्रज्ञानातील अद्ययावतता ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे. जगभरात महासंगणकनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरू आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार, चीन आणि अमेरिका हे महासंगणाकाच्या यादीत सर्वोच्च स्थानावर असून, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रिकदृष्ट्या मागे रहाणे परवडणारे नाही, असे मत संगणकतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. यासाठीच केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय महासंगणक अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत देशात तब्बल 73 महासंगणकांची निर्मिती केली जाणार आहे. यापैकी 2022 सालापर्यंत 11 महासंगणक कार्यरत करण्याचा अभियानाचा मानस असून, नुकतेच केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे महासंगणक पूर्णत: भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असणार असून, ही यंत्रणा विकसित करण्याचे काम पुण्यातील “सी-डॅक’ या संस्थेवर सोपविले आहे. भारतीय तंत्रज्ञानावर आधारित या महासंगणकाची क्षमता ही तब्बल 10 पेटाफ्लॉप असणार आहे, अशी माहिती महासंगणक अभियानाचे प्रमुख मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
भारतात सध्या 5 महासंगणक कार्यरत
विविध माहितीवर जलद प्रक्रिया करण्याची उच्चक्षमता असणारे महासंगणक हे हवामान बदल आणि अंदाज, राष्ट्रीय सुरक्षा आणि शासकीय यंत्रणा या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरते. सध्या भारतात 5 महासंगणक कार्यरत आहेत. यातील 2 महासंगणक पुण्यातील आयआयटीएम येथे प्रत्युष, आयसर येथे परम ब्रम्हा, एक पश्चिम बंगाल येथील आयआयटी खरगपूर येथे परमशक्ती, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे परम शिवाय आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथील नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्ट येथे मिहिर या महासंगणकाचा समावेश आहे.