लंडन – युक्रेनवर युद्ध लादलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी आयोजित प्रचार सभेत सहभागी झालेल्या रशियाच्या ऑलिम्पिकपटूंवर बंदीची टंगती तलवार आली आहे.
पुतीन यांच्या समर्थनार्थ मॉस्कोतील लुझनिकी स्टेडियममध्ये एका प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुतीन यांनी भाषणही केले. या प्रचार सभेत सहभागी झालेला रशियन जलतरणपटू एव्हगेनी रेलोव्हची जागतिक जलतरण संघटनेकडून (फिना) चौकशी होणार आहे. तसेच स्पीडो कंपनीने रेलोव्हबरोबरचा करारही रद्द केला आहे.
रेलोव्हसह फिगर स्केटिंगपटू व्हिक्टोरिया सिनित्सिना, निकिता कात्सालापोव्ह, एव्हगेनीया तारासोव्हा आणि व्हादिमीर मोरोझोव्ह, स्कीइंगपटू अलेक्झांडर बोल्शूनोव्ह आणि रिदमिक जिम्नॅस्टिक्सपटू डिना व अरिना या अव्हेरीया भगिनी हे रशियन ऑलिम्पिकपटू पुतिन यांच्या प्रचार सभेत उपस्थित होते. आता त्यांच्यावर जागतिक महासंघ काय कारवाई करणार हे येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.