सातारा -साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसऱ्या क्रमाकांचे उंच कांचनगंगा हे शिखर गुरुवारी सर केले. हिमालय पर्वतरांगांमधील प्रियांकाची मोहीम यशस्वी झाल्याने साताऱ्यात क्रीडाप्रेमींनी फटाक्यांच्या आतषबाजीत आनंद व्यक्त केला.
जगातील सर्वोच्च पर्वतशिखर एव्हरेस्ट आणि काराकोरम पर्वतरांगांमधील के2 या शिखरानंतरचे कांचनगंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखर भारताचे ईशान्येकडील राज्य सिक्कीम आणि नेपाळच्या पूर्व सीमेवर दार्जिलिंगपासून 74 किलोमीटर अंतरावर आहे. या शिखराची उंची आठ हजार 586 मीटर (28 हजार 169 फूट) आहे.
हे भारतीय भूमीतील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. जगातील सर्वोच्च पर्वतशिखर एव्हरेस्टप्रमाणे कांचनगंगा शिखरावरील चढाईदेखील कठीण आहे. कांचनगंगावरील चढाईची मोहीम प्रियांकाने गुरुवारी दुपारी 4 वाजून 52 मिनिटांनी पूर्ण केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. तिने बेस कॅम्पवर उतरण्यास प्रारंभ केला असून, ती लवकरच भारतात परतेल, असेही तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
कांचनगंगा पर्वतशिखरावरील यशस्वी मोहिमेमुळे जगातील आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीची पाच पर्वतशिखरे सर करणारी प्रियांका ही पहिली भारतीय महिला ठरली आहे, असा दावा मोहिते कुटुंबीयांनी केला आहे. अन्नपूर्णा शिखर सर करणारी प्रियांका ही पहिली भारतीय महिला ठरली होती. जगातील विविध पर्वतरांगांमधील आणि एव्हरेस्टवरील यशस्वी गिर्यारोहण मोहिमांमुळे प्रियांकाला 2020 साली “तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते