पुणे – “आओ जाओ घर तुम्हारा’ बनलेल्या ससूनमधील कुप्रसिद्ध झालेल्या “वॉर्ड 16′ मध्ये आता कैद्यांची “प्रायव्हसी’ हरवणार आहे. हा वॉर्ड इतरत्र स्थलांतरित केला जाणार असून, आता “डॉर्मेटरी’ अर्थात सलग पद्धतीचा वॉर्ड शोधला जाणार आहे. त्याचा शोध संपल्यानंतर हा वॉर्ड तेथे हलवण्यात येईल.
ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. या वॉर्ड 16 मध्येच पाटील उपचारासाठी दाखल होता आणि येथूनच तो ड्रगरॅकेट चालवत होता हे तपासातून पुढे आहे. येरवडा कारागृहापेक्षा या वॉर्ड 16 मध्ये संपूर्णपणे “प्रायव्हसी’ मिळत असल्याने अनेक श्रीमंत कैदी “लक्ष्मी’दर्शन करून ही प्रायव्हसी मिळवत होते, हेदेखील आता पुढे आले आहे. त्यामुळे आता ही “प्रायव्हसी’च काढून टाकण्याचे आदेश ससूनच्या कैद्यांच्या देखरेख समितीने दिले आहेत.
या वॉर्डमध्ये अनेक खोल्या आहेत. या खोल्यांचा वापर हे “विशेष’ कैदी “विशेष प्रायव्हसी’ मिळवण्यासाठी करत होते. येथे त्यांना “मैत्रिणीं’सह अनेकजण बिनदिक्कत भेटायलाही येत असत. त्या खोल्या म्हणजे त्यांच्या “प्रायव्हेट रूम’च बनल्या होत्या. मैत्रिणी, मोबाइल, खाणे-पिणे, फिरणे या सगळ्या “फॅसिलिटी’ त्यांना मिळत होत्या. खोलीत काय चालले आहे, हे पहायलाही कोणी जात नव्हते. आता ही “प्रायव्हसी’च काढून टाकण्यात येणार आहे.
कैद्यांना ठेवणार नजरेच्या टप्प्यात
ससूनच्या इमारतीत परंतु डॉर्मेटरी स्वरुपातील जागा प्रशासनाला शोधायला समितीने सांगितले आहे. जेणेकरून उपचारासाठी आलेले सर्व कैदी नजरेच्या टप्प्यात राहतील आणि कोणालाही “विशेष’ सवलत मिळणार नाही. त्यादृष्टीने ससून प्रशासनानेही आता प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पाटीलमुळे “लाइमलाइट’ मध्ये आलेला हा वॉर्ड आणि तेथील “फॅसिलिटी’ आता लवकरच बंद होणार असल्याचे समितीतील एका सदस्याने सांगितले.