नगर – मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून रविवारी नगर शहरात होत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी घुसून व्यासपीठावर लावण्यात आलेल्या मंत्र्यांची छबी असलेला फलक फाडला.
दरम्यान कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून आयोजकांनी स्वत:हून हा बॅनर खाली उतरवून घेतला. नगर शहराजवळील छत्रपती संभाजीनगर रोडवर एका मंगल कार्यालयात रविवारी प्राथमिक शिक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर उपस्थित राहणार होते.
ते मात्र, या कार्यक्रमाला आले नाही. दरम्यान व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर मंत्री केसरकर यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे फोटो होते.
अधिवेशनाला प्रारंभ होताच कार्यक्रमस्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जात प्रचंड घोषणाबाजी करीत थेट फलकावर हल्ला चढविला. यावेळी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी असल्याचे एकच गोंधळ उडाला. दरम्यान आयोजकांनी स्वत:हून बॅनर काढला.