पुणे -राज्यातील कारागृहांत आता रेस्टॉरंटच्या धर्तीवर खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. हे खाद्यपदार्थ कैद्यांना कॅन्टिनमधून खरेदी करता येणार आहेत. पूर्वी मिळत असलेल्या खाद्यपदार्थांच्या संख्येत वाढ करत काही चविष्ट व मागणी असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला आहे. इतकेच नव्हे तर कैद्यांना हेअर प्रोडक्टही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अतिरीक्त महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार अंडी, दूध, बेकरी उत्पादने कारागृहांतील कॅन्टिनमध्ये उपलब्ध होते. या खाद्यपदार्थांमध्ये वाढ केली असून “रेडी टु इट’ प्रोडक्टचाही समावेश आहे.
तसेच मासे, चिकण, मिठाई, सोनपापडी, ड्रायफ्रुट, कचोरी, समोसा, पनीर, विविध प्रकारचे ज्यूस, अंडाकरी, मिनरल वॉटर, फळे, शुद्ध तूप आदी पदार्थांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तर, करोनाकाळात कैद्यांना प्रोटीन आणि व्हिटामिन असलेला डाएट देण्यात येत आहे.