पुणे : देशात महागाईने सर्वसामान्य नागरीक मेटकूटीस आला असताना राज्यासह देशभरात भोंगे व इतर धार्मिक राजकारणाचे मुद्दे पुढे करत महागाईच्या विषयापासून सर्वसामान्यांचे लक्ष दूर केले जात आहे. या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने गुडलक चौकात भोंगे वाजवा आंदोलन करण्यात आले.
या वेळी भोंग्यांवर राष्ट्रवादीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महागाईवरून तत्कालीन युपीए सरकारवर केलेल्या टिकांच्या क्लीप ऐकविण्यात आल्या. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते, शहर उपाध्यक्षा श्वेता मिस्त्री ,प्रीती धोत्रे ,अपर्णा पाटसकर ,पूनम धोत्रे ,हार्डीका ओव्हाळ ,मृणाल ओव्हाळ ,प्रियांका सोनवणे,राखी श्रीराव यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
तर येत्या काळात केंद्रा जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करत नागरिकांना दिलासा दिला नाही तर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस शहरातील प्रत्येक चौकात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर अशा प्रकारचे भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदीं च्या तत्कालीन भाषणाची आठवण वेळोवेळी नागरिकांना करून देण्यासाठी शहरभर ही आंदोलन केली जातील असा इशारा जगताप यांनी यावेळी दिला.