पुणे – पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा नवा अध्याय ठरणाऱ्या मेट्रो प्रकल्पासह, महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा दौरा होत असल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादीने या दौऱ्यास विरोध केला या दोन्ही पक्षांकडून शहरात निदर्शने करण्यात येणार आहेत. तर पंतप्रधानांच्या दौऱ्यांसाठी शहरातील काही रस्ते बंद ठेवण्यात येणार असून पंतप्रधानांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याने राज्यशासनाकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पंतप्रधानांचे पुण्यात स्वागत करणार आहेत.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात ते सकाळी 10 वाजता महापालिकेस भेट देणार असून महापालिकेच्या हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. तर त्यानंतर, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार असून ते गरवारे मेट्रो स्थानक ते आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत.
या कार्यक्रमानंतर महापालिकेच्या नदी सुधार योजना व नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच 140 ई-बसेस, ई-बस डेपो, आर. के लक्ष्मण आर्ट गॅलरीचे लोकार्पणाचा सोहळा पौड रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर लवळे येथील सिंबायोसिस महाविद्यालयाच्या कार्यक्रम होणार आहे.
शहरात 2200 पोलीस तैनात
पुणे, दि. 5 -पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त शहरात तब्बल 2200 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याची रंगीत तालीम शहरात करण्यात आली. तसेच त्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्याचीही पहाणी करण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही राजकीय पक्ष काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरही पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा एका पुलावर अडवून ठेवल्याची घटना लक्षात घेता, पुणे पोलीस विशेष काळजी घेताना दिसत आहेत. डेक्कन जिमखाना भागातील खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता आणि पौड रस्ता (शिवतीर्थनगर) रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.