नवी दिल्ली – बुधवार (8 फेब्रुवारी) पासून संसदेच्या 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलं असल्याचं दिसून आलं. आणि याच निळ्या रंगाच्या जॅकेटची आता देशभर चर्चा रंगली आहे. मोदींनी परिधान केलेलं हे जॅकेट एका विशिष्ट कापडापासून तयार करण्यात आलेलं आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून पंतप्रधान मोदींचं हे निळ्या रंगाचं जॅकेट बनवले आहे.
अर्थसंकल्पीय अभिभाषणावर सरकारने मांडलेल्या आभार प्रस्तावावर पंतप्रधानांनी भाषण केलं. यादरम्यान मोदींनी संसदेत संबोधित करताना प्लास्टिकपासून पर्यावरण वाचवण्याचा संदेशही दिला होता. दरम्यान, यावेळी परिधान करण्यात आलेलं हे जॅकेट कोणत्याही कापडापासून बनवलेले नसून 28 सिंगल यूज प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवले आहे. तसेच, हे जॅकेट दोन दिवसांपूर्वी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना बंगळुरुमध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीकमध्ये भेट दिलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आता हे जॅकेट सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने चेअरमन एस एम वैद्य यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “तीन महिन्यांच्या आत प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवलेले जॅकेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.
प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेली उत्पादने केवळ तेल विपणन कंपन्या किंवा लष्कराच्या जवानांपुरते मर्यादित राहणार नसून हे आता सर्वांना वापरता येणार आहेत’. तसेच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 100 दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे लक्ष्य ठेवले आहे. हे जॅकेट पेट्रोल पंपावरील सहाय्यकांना देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.