दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज रविवारी 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. हा 100 वा भाग ऐतिहासिक बनवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. हा भाग देशभरातील 4 लाख केंद्रांवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. ‘मन की बात’च्या या कार्यक्रमात देशभरातील विविध सामाजिक संस्था, नागरी संस्था आणि इतर संघटनाही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
नऊ वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेला हा विशेष रेडिओ कार्यक्रम रविवारी 100 भाग पूर्ण करणार आहे. या नऊ वर्षांत ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी विविध मुद्यांवर आपली मतं मांडली. याशिवाय त्यांनी या कार्यक्रमाच्या मध्यमातून देशातील जनतेशी थेट संवादही साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमामुळे अनेकांचा रेडिओ ऐकण्याचा कल वाढला. नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात रेडिओ कार्यक्रमाच्या 100 व्या भागाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले होते.
भाजपच्या सर्व लोकसभा खासदारांना आपाल्या मतदारसंघात नागरिकांसह हे प्रसारण ऐकण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीने देशभरात 2150 ठिकाणी हे प्रसारण ऐकण्याची व्यवस्था केली आहे. हे प्रसारण ऐकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याचं उद्दिष्ट भाजपकडून ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही प्रसारित होणार आहे. या खास प्रसंगी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की- “मन की बातने महिलांना आर्थिक, सशक्तीकरण, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मुद्द्यांवर विकासाच्या क्षेत्रात जागरुक केले आहे.”
Mann ki Baat has catalyzed community led action on sanitation, health, women’s economic empowerment and other issues linked to the Sustainable Development Goals. Congratulations @narendramodi on the 100th episode. https://t.co/yg1Di2srjE
— Bill Gates (@BillGates) April 29, 2023
न्यूयॉर्क,आणि लंडनमध्येही ‘मन की बात’ प्रसारित होणार
मन की बातचा हा ऐतिहासिक भाग न्यूयॉर्कमध्येही ऐकायला मिळणार आहे. हा कार्यक्रम स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता प्रसारित केला जाईल. रविवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐतिहासिक ठरणार आहे. लंडनमध्येही हा कार्यक्रम ऐकता येणार आहे.