नवी दिल्ली – अनेक गोष्टींच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कार किंमतीवरही मोठा परिणाम झालेला आहे. त्याचा काही भार ग्राहकांनी उचलणे आवश्यक बनले आहे, असे वाहन उत्पादकांचे म्हणणे आहे. मारूती सुझुकीच्या वेगवेगळ्या मॉडेलसाठीची वाढ वेगवेगळी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील मोटार उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या मारूती सुझुकी कंपनीने 1 जानेवारीपासून कंपनीच्या कार मॉडेलच्या किंमती वाढवण्यात येणार असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे.
याआधी येणारे वर्ष हे 2020 च्या तुलनेत अधिक चांगले असेल असे कंपनीने सांगितले होते. अर्थव्यवस्था सुधारत आहे आणि करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडून ग्राहक कार खरेदी करण्यास येत असल्याचे निरीक्षण कंपनीने नोंदवले होते.
पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कंपनीच्या उत्पादनाला तडाखा बसला होता. त्यातून आता मारूती हळूहळू उत्पादन पूर्वपदावर आणले आहे. आता आमच्या प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरु झाल्याचे कंपनीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी एका वृत्त संकेतस्थळाला सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात सुझुकीने एकूण उत्पादन 5.19 टक्क्यांनी वाढवून 1,50,221 वाहनांचे उत्पादन केले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनीने 1,41,834 वाहनांचे उत्पादन केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये प्रवासी वाहनांचे उत्पादन 1,39,084 इतके होते. यंदा ते 1,46,577 वर पोचले आहे.