पिंपरी – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या वाहन उत्पादक प्रकल्पांना भेट देत, इलक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती जाणून घेतली. राज्याने इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले असून पर्यावरणपूरक असलेल्या इलेक्ट्रीक वाहन खरेदीला नागरिकांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पर्यावरण मंत्री ठाकरे बुधवारी (दि.29) एमआयडीसीमधील विविध कंपन्यांना भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या समवेत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर होते. मंत्री ठाकरे यांनी इलक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित बस निर्मिती आदी माहिती घेतली.
ते म्हणाले की, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने पर्यावरणपूरक “इलक्ट्रिक वाहन धोरणाचा’ स्वीकार केला आहे. राज्यातील इलक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या ठराविक कंपन्यांना मी भेट देत असून त्यांच्यासोबत चर्चा करत आहे. कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने उत्पादन केले जाते. उत्पादन क्षमता किती आहे, याची माहिती घेत आहोत. इलक्ट्रिक वाहने बाजारात आल्यानंतर किती लोकांना ही वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहित करु शकू, किती लोक इलक्ट्रिक वाहने घेऊ शकतील. याची चाचपणी केली जात आहे.
राज्यात प्रदूषण वाढत आहे. त्यासाठी सरकार इलक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्री ठाकरे यांनी सांगितले. वाहन निर्मितीबाबत समाधान व्यक्त करून ते म्हणाले, मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये इलक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
लांब व जवळच्या पल्ल्याचे अंतर लक्षात घेवून आसन क्षमतेची व्यवस्था करावी. इलक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत आहे. पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी राजकीय व अन्य विषयावर भाष्य करण्याचे टाळत पुण्यामध्ये पत्रकार परिषद असून तेथे सविस्तर बोलणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
युवा सेनेकडून स्वागत
पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आलेले पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे युवा सेनेने आकुर्डी येथे जोरदार स्वागत केले. पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेच्या वतीने ठाकरे यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख, माजी मंत्री सचिन अहिर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, अजिंक्य उबाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे यांच्या शहर दौऱ्यामुळे युवा सेनेत उत्साह पाहायला मिळाला.