पुणे – केंद्र शासनामार्फत धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 31 मार्चपर्यंत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप होणार आहे.
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द, जैन धर्मिय विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.
नूतनीकरणांतर्गत 4 लाख 31 हजार 355 विद्यार्थ्यांना आधी शिष्यवृत्ती वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे 47 कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध झाला आहे. 1 लाख 64 हजार 153 विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा झाली आहे.
नूतनीकरणातील 72 विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरून शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील या विद्यार्थ्यांनी होस्टेलच्या सुविधेची शिष्यवृत्ती मिळविण्याचा प्रयत्न केला होता.
राज्यातील 2 लाख 85 हजार 451 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा कोटा आहे. या नवीन विद्यार्थ्यांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र शासनाकडून हा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. तो मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितली.