इस्लामाबाद – भारत, दुबई, अमेरिका आणि आखाती देशांमधील सुमारे 200 हिंदू भाविकांनी काल पाकिस्तानातील जीर्णोद्धार झालेल्या मंदिरात प्रार्थना केली. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या भाविकांनी पाकिस्तानातील खैबर पख्तुन्वा प्रांतातील मंदिरामध्ये धार्मिक विधी आणि प्रार्थना केली.
करक जिल्ह्यातील हे मंदिर म्हणजे परमहंसजी महाराजांची समाधी आहे. गेल्या वर्षी कट्टरवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात या मंदिराची प्रचंड मोडतोड झाली होती. त्यानंतर पाकिस्तानातील सरन्यायाधीशांच्या आज्ञेमुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय भाविकांच्या भेटीच्या या कार्यक्रमात भारतातील 200, दुबईतील 15 आणि उर्वरित अमेरिका आणि आखाती देशांमधील भाविक सहभागी झाले होते.
भारतातील भाविक वाघा सीमेवरून लाहोरला पोचले. तेथून त्यांना सुरक्षा रक्षकांच्या ताफ्याबरोबर मंदिरापर्यंत नेण्यात आले. हे सर्व भाविक शनिवारीच मंदिरात पोहोचले होते. त्यानंतर रविवारी तेथे पूजा आणि अन्य धार्मिक विधी करण्यात आले. सत्तारूढ पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे खासदार आणि पाकिस्तान हिंदू कौन्सलचे प्रमुख डॉ. रमेश कुमार वांकवाणी यांनी धार्मिक पर्यटनाला पाकिस्तान सरकारकडून सहकार्य मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.