Prakash Solanke : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या गाड्यांची देखील जाळपोळ करण्यात आली आहे.
सुदैवाने आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे. या दगडफेकीमध्ये घरासह गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर ते समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माजलगावचे राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता.
याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले आणि त्यांनी सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक आणि जाळपोळ केल्याचे म्हंटले जात आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्याचे दिसते. यावेळी काही तरूणांनी गेट तोडून प्रकाश सोळंके यांच्या घरात प्रवेश केला. घराच्या काचा फोडल्या.
तसेच पार्किंगमधील तीन ते चार गाड्या फोडल्या आणि त्या पेटवून देण्यात आला. पोलिसांकडून जमावाला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अपयशी ठरला. जवळपास हजारापेक्षा जास्त मराठा समाजबांधव घराभोवती जमले होते.
दरम्यान, या घडलेल्या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांच्यावर संतप्त टीका केली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत?
गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एक महिन्यापासून गृहमंत्र्यांचं अपयश सतत सांगत आहे. आमदाराच्या घरावर हल्ला होत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी गृहमंत्रालय आणि ट्रिपल इंजिन खोके सरकारची आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही?’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.