मुंबई – जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले जरी उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे.
मराठा आरक्षण आणि नोकरभरती संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शेंडगे म्हणाले की, मराठा समाजातील काही संघटना तसेच काही नेते मंडळी हे मराठ समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करत आहेत. हे नेते मंडळी अशी मागणी करून राज्यात असलेलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवत आहेत, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारने पारित करू नये, जर असा प्रस्ताव पारित झाला तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तां आक्रोश होईल. तसेच ओबीसी आरक्षण बचावासाठी 3 नोव्हेंबर ला राज्यव्यापी आंदोनल करणार असल्याचेही यावेळी शेंडगे यांनी सांगितले.