बेंगळुरू – संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या भारताच्या “चांद्रयान-3′ मोहिमेत प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्रावर फिरून विविध माहिती गोळा करत आहे. चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने शतक पूर्ण केले आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर आतापर्यंत 100 मीटरचे अंतर कापले आहे, अशी माहिती इस्रोने शनिवारी दिली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. चांद्रयान-3 मोहिमेची प्रज्ञानचे शतक पूर्ण झाले आहे. त्याने आतापर्यंत चंद्रावर 100 मीटरपेक्षा जास्त प्रवास केला आहे. प्रज्ञानचा प्रवास अजूनही सुरू असल्याची माहिती इस्रोने आपल्या ट्वीटमध्ये दिली.