नवी दिल्ली: मार्च महिन्यात निर्यात वाढून 12.8 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर जाईल असा दावा उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी केला. ते म्हणाले की, औषधी क्षेत्राकडून अधिक निर्यात होण्याची शक्यता वाढली आहे. संपूर्ण 2018-19 या आर्थिक वर्षात भारताची निर्यात 331 अब्ज डॉलरची होईल असे त्यांना वाटते. औषध क्षेत्राची निर्यात 19 अब्ज डॉलर पर्यंत जाईल असे त्यांनी सांगितले.
15 एप्रिल रोजी याबाबतची औपचारिक आकडेवारी वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारताची निर्यात वाढत नव्हती मात्र सरकारने पर्यायी बाजारपेठा शोधण्याचे काम केले असून आता त्याला यश येऊ लागले आहे.त्यामुळे निर्यात वाढण्याची शक्यता वाढली आहे. अन्न व कृषी उत्पादने, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातूनही निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र जगातील अनेक देशांदरम्यान व्यापार युद्ध सुरू असल्यामुळे आगामी काळात याचा जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे जागतिक व्यापार संघटनेने जाहीर केले होते. प्रभू म्हणाले की, चीन अमेरिका या देशाबरोबर व्यापारातील मतभेद कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत.