पुणे : पत्रकारितेत करिअर घडविण्याची ज्यांना इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना पुण्यातील अग्रगण्य दैनिक प्रभातने प्रभात कॉलेज कनेक्ट २.० या उपक्रमा द्वारे संधी उपलब्ध करून दिली आहे. ” प्रभात कॉलेज कनेक्ट २.० ” या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इच्छूक विद्यार्थ्यांना आपल्यातील पत्रकारितेच्या गुणांना वाव देता येणार आहे. रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी दैनिक प्रभात च्या कार्यालयात प्रभात कॉलेज कनेक्ट २.० ची कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रभात चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी केले. यावेळी मानव संसाधन व्यवस्थापक प्रवीण थूल उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अविनाश भट यांनी पत्रकारिता विश्वातला त्यांचा सुवर्ण प्रवास सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्याचबरोबर समाजातल्या सकारात्मक गोष्टींचं प्रतिबिंब सुद्धा आपल्या बातमीमध्ये उतरणं गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यशाळेतील पहिले सत्र विश्वकर्मा विद्यापीठात सहायक प्राध्यापक असणारे अभिषेक भोसले यांनी घेतले. भोसले यांनी विद्यार्थ्यांना बातमीचे लेखन कशा प्रकारे करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून उदाहरणा दाखल बातमी सुद्धा लिहून घेतली.
दुसऱ्या सत्रात पवन ढावरे यांनी विद्यार्थ्यांना फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी याबाबत मार्गदर्शन केले. ढावरे यांनी प्रात्यक्षिका द्वारे विद्यार्थ्यांना मोबाईल फोटोग्राफी बद्दल महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या उपक्रमाचे समन्वयक अमोल कचरे यांनी केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभला.