महापुरामुळे नव्या राज्यघटनेचे समारंभ पाकिस्तानमध्ये रद्द
नवी दिल्ली, ता. 13 – पाकिस्तानच्या अनेक भागात महापुराची भयावय स्थिती निर्माण झाल्याने पाकिस्तान सरकारने उद्याचे नव्या राज्यघटनेनिमित्त होणारे सर्व समारंभ रद्द केले आहेत. अशी बातमी पाकिस्तान रेडिओवरून सांगण्यात आली.
भुट्टोंना गांधींचा अभिनंदन संदेश
नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा अभिनंदन संदेश पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना पाठविला आहे. भारत व पाकिस्तानला भेडसावणारे समान प्रश्न दोन्ही देश “सदिच्छेने व चर्चेतून’ सोडवतील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींचा संदेश
नवी दिल्ली – राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी पाकिस्तानचे नवे अध्यक्ष फासल इलाही यांना अभिनंदन संदेश पाठविला आहे.
धान्यसाठा बाहेर काढण्यासाठी भारत संरक्षण कायदा वापरा
नवी दिल्ली – कॉंग्रेस पार्लमेंटरी पक्षाच्या कार्यकारिणीने असा ठराव केला की, भाववाढ रोखण्यासाठी काही कडक उपाय योजावेत व साठेबाज व काळाबाजारवाले यांचेविरुद्धही परिणामकारक उपाययोजना करावी. धान्यसाठे बाहेर काढण्यासाठी भारत संरक्षण कायद्याचा वापर करावा. केंद्राने याप्रकरणी राज्य सरकारांना थोडी समज द्यावी व भाववाढ रोखण्याच्या कामी हालचाल करण्यास त्यांना बजवावे
ग्रामीण भागाभिमुख वैद्यकीय शिक्षण हवे
नवी दिल्ली – ग्रामीण भागात अधिक वैद्यकीय सोयी पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण अधिक समाजहिताचे व्हावे व खासगी डॉक्टरांना अधिक सार्वजनिक आरोग्य अधिकारी म्हणून नेमण्यात यावे अशी शिफारस येथे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा समारोप करताना करण्यात आली.