मुळशी, वेल्हे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये नवीन जोडणी देण्याची प्रक्रिया
पुणे – महावितरणच्या पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत 968 कृषी पंपांना वीजजोडणी देण्याच्या वीजयंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे, तर 691 कृषी पंपांची वीजजोडणी कार्यान्वित केली आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.
पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये पैसे भरून प्रलंबित असलेल्या एकूण 1 हजार 367 कृषी पंपांना एचव्हीडीएसमधून वीजजोडण्या देण्यात येत आहेत. सध्याच्या पद्धतीनुसार कृषी पंपांना 63 केव्हीए/100 केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावर जवळपास 15 ते 20 कृषी पंपांना वीजपुरवठा केला जातो.
लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषी पंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.
वीज चोरी करता येणार नाही…
उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही. उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजहानीमध्ये घट होईल.एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषी पंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल.
कृषी पंपधारकांनी विद्युतभाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये 10 केव्हीए, 16 केव्हीए व 25 केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीविरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषी पंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.