इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने भारताचा आक्षेप धुडकावून पाकिस्तानव्याप्त काश्मिरात 1124 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोहला जलविद्युत प्रकल्प नावाने हा प्रकल्प तेथे राबवला जाणार आहे. चीनच्या एका कंपनीच्या मदतीने तेथे हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी एक त्रिपक्षीय करारही निश्चित करण्यात आला आहे.
झेलम नदीच्या किनारी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यातून पाच अब्ज युनिट वीज स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मिरात चीन आणि पाकिस्तान यांचा इकॉनॉमिक कॉरिडॉर उभा राहात आहे. तीन हजार किमी लांबीचा हा कॉरिडॉर असून हा प्रकल्प त्याच कॉरिडॉरमधील गुंतवणुकीचा भाग आहे. चीनचा शिंजीयांग प्रांत आणि पाकिस्तानचे ग्वादर बंदर यांना जोडणाऱ्या या कॉरिडॉरमध्ये रेल्वेलाइन, रस्ते, पाइपलाइन आणि ऑप्टिकल फायबर केबललाइनही टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
मूळचा हा प्रदेश भारताचा असून तो पकिस्तानने बेकायदेशीररित्या बळकावला आहे. आता पाकिस्तानने तेथे चीनच्या मदतीने मोठीच कामे हाती घेतली आहेत. दोन्ही देशांच्या तेथील उपस्थितीला भारताचा आक्षेप आहे. त्याबद्दल भारताने चीनलाही आपला निषेध कळवला आहे. गेल्याच महिन्यात पाकिस्तानने गिलगीट-बाल्टिस्तान येथे मोठे धरण बांधण्याचेही कंत्राट संबंधित कंपनीला दिले आहे त्याचाही भारताने पाककडे निषेध नोंदवला