पुणे -मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त शहरातील कामांच्या पाहणीसाठी भेटी देत असून हे अधिकारी जाणार असलेल्या भागातच केवळ खड्डे बुजवले जात आहेत. त्यामुळे शहरात खड्डे असूनही आयुक्त मात्र खड्डे दुरूस्तीचा दावा करत आहेत. तर, रस्त्यांची चाळण झाल्याने पुणेकरांची डोकेदुखी वाढली आहे.
आयुक्तांनी मागील आठवड्यातच खड्डेप्रश्नी पथ विभागाला फैलावर घेत चार दिवसांत रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच खड्डे असलेले रस्ते 31 मेपूर्वी दुरूस्त का केले नाहीत, म्हणून 4 अभियंत्यांना नोटीसही बजावल्या. मात्र, त्याच दिवसापासून शहरात सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे खड्डे दुरुस्तीच सुरू झाली नाही. पाणी साचले नसेल, त्याच भागात काम केले जात आहे.
तर अनेक भागांत आयुक्तांच्या धास्तीने डांबर खडी टाकून तकलादू काम केले जात आहे. त्याचा फटका वाहनचालकांना बसत असून वाहने घसरून पडत आहेत. तर, आयुक्त विक्रम कुमार यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा यापूर्वीच दिला आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची अवस्था “जैसे थे’ आहे. याचा त्रास मात्र वाहनचालकांना सहन करावा लागत असून पाठ, मणक्यांचे आजार वाढत आहेत.
केवळ कागदावरच होतेय दुरूस्ती
शहरातील 12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. तर त्यापेक्षा रुंद रस्ते मनपा मुख्य खात्याच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे रस्ते दुरुस्ती दोन वेगवेगळ्या विभागांकडून केली जात आहे. ज्या रस्त्यावर उड्डाणपूल, ड्रेनेज, समान पाणीपुरवठा योजनेसाठी खोदकाम सुरू आहे, त्या रस्त्यांची जबाबदारी संबंधित विभागाकडे आहे. त्यामुळे खड्डे पडल्यानंतर त्यांची जबाबदारी केवळ कागदावरच निश्चित आहे. “रस्ता आपला नाही’ असे सांगत कोणतेच विभाग काम करत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, केवळ कागदोपत्री खड्डे दुरुस्ती होत आहे.
दीड महिन्यांत तब्बल 17 हजार खड्डे
शहरात दि. 1 जून 2023 ते 26 जुलै या काळात तब्बल 17 हजार 193 खड्डे आढळून आले आहेत. खुद्द पालिका प्रशासनाने याबाबत धक्कादायक माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, शहरातील 16 हजार 747 खड्डे बुजवले आहेत. तर 444 खड्डे दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. पथ विभागाने दि. 31 मेपूर्वीच शहरातील 90 टक्के रस्ते दुरूस्त केल्याचा दावा केला होता. पण, त्यानंतरही तब्बल 17 हजार खड्डे कुठून आले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच, यावर नेमका किती खर्च झाला? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.