पुणे – शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश, शालेय साहित्य, दप्तर, बूट यासाठीचे अनुदान पालिकेने दिलेले नाही. अखेर याबाबत माध्यमांनी कान टोचल्यानंतर पालिकेने या साहित्यासाठीचे दर मागवले आहेत. ही दरनिश्चिती करून मुलांना साहित्यासाठी अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.
महापालिकेच्या 285 हून अधिक शाळा असून, येथे लाखभर विद्यार्थी शिक्षण घेतात. मनपा शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वीच हे साहित्य खरेदी करून वाटप केले जात होते. मात्र, या खरेदीत गैरव्यवहार झाले. तसेच न्यायालयानेही अनेकदा कान टोचले. त्यामुळे महापालिकेने 2017-18 पासून या वस्तूंच्या बाजारभावानुसार थेट त्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा करण्यास पालिकेने सुरूवात केली. मात्र, 2020 नंतर करोनामुळे मुलांना ही रक्कमच दिली गेली नाही. यंदापासून हे काम सुरळीत होईल, असे वाटत असतानाच जुलै संपत आला, तरी पालिकेने कोणतीही प्रक्रिया केलेली नव्हती.
निधीसाठी दीड महिना जाणार
आता या वस्तूंचे दर मागवण्यात आले आहेत. ते देण्यासाठी दि. 1 ऑगस्टची मुदत आहे. दर आल्यानंतर ते अंतिम करणे, त्यानुसार प्रत्येक इयत्तेनुसार बिल तयार करणे, मुलांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आणि दीड महिने जाणार आहेत. प्रत्यक्षा हे काम शाळा सुरू होण्याच्या काळात अपेक्षित होते. आता त्याला सप्टेंबर उजाडणार आहे.