पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभाग विभागांमधील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी अर्ज करण्याची उद्या (दि.31) शेवटची मुदत आहे. विविध करणास्तव अर्ज करू न शकलेल्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची शेवटची संधी राहणार आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात विविध शैक्षणिक विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्यासोबतच परराज्यातील विद्यार्थ्यांचीही पसंती असते. यंदा अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 10 ऑगस्ट होती. मात्र, विद्यार्थ्यांनी मुदतवाढीची मागणी गेल्यामुळे अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. अनलॉक प्रक्रियेत मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.
ही प्रवेश परीक्षा येत्या काही दिवसांत “ऑनलाइन प्रॉक्टर्ड मेथड’द्वारे होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा घरबसल्या देता येणार आहे. प्रवेश परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने मॉक टेस्ट आयोजनही केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, विद्यापीठातील विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 31 हजारांहून अधिक असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.