सोलापूर – राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी पंढरपुरात वंचित बहुजन आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या नेतृत्वात सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरेकेडिंग लावण्यात आले आहेत. उद्या रात्रीपर्यंत जवळपास 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा पंढरपुरात तैनात असणार आहे.
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर राज्यातील मंदिने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली असतानाही राज्यातील करोनाचा संसर्ग कायम असल्याने ठाकरे सरकारकडून मंदिरांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. ही बंदी उठवित मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्याही आगारातून पंढरपुराकडे येणारी एसटी वाहतूक बंद करण्याचा हा प्रस्ताव होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि पंढरपुरातील स्थानिक यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती ग्रामीण पोलीस विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. तर पोलिसांच्या या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर दिली असून, एसटी प्रशासनास तसे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.