अंगारकी चतुर्थीला “देऊळबंद’ची शक्‍यता

करोनाचा संसर्ग फैलावत असल्याने प्रशासनाकडून आदेश निघणार?

मोरगाव,  -करोना विषाणूजन्य आजाराचे रुग्ण शहरी बरोबरच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यावर्षातील पहिली अंगारकी चथुर्ती (दि.2) मार्च रोजी आहे. या चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने अष्टविनायक तीर्थक्षेत्री लाखोंच्या संख्येने गणेशभक्त “श्रीं’च्या दर्शनाला येतात. मात्र करोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दिवशी अष्टविनायक मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून निघण्याची शक्‍यता आहे.

अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, पाली, महाड या सर्वच तीर्थक्षेत्री भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने होते. प्रत्येक तीर्थक्षेत्र पहाटे पाच ते मंदिर बंद होईपर्यंत साधारणतः एक ते दीड लाख भाविक गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अष्टविनायकक्षेत्री यात्रेचे स्वरूप आलेले पाहावयास मिळते.

यादिवशी हॉटेल व्यवसाय, रसवंती व शीतगृहे, श्रींच्या प्रतिमांचे फोटो विक्री, हार, दुर्वा, नारळ व प्रसाद विक्री, लॉज व भक्‍तनिवास, देवस्थान समितीस मिळणारे गुप्त अथवा रोख स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नाची उलाढाल वरील सर्वच तीर्थक्षेत्री प्रत्येकी साधारणतः 40 ते 50 लाख रुपयांची होते. यादिवशी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत गणेशभक्‍त अंगारकीला अथवा अष्टविनायक यात्रेच्या निमित्ताने येत असतात. करोना विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शासनाकडून मंदिर बंद ठेवण्याबाबतचे आदेश काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे अष्टविनायक मंदिर सुरु राहणार का? बंद राहणार, याकडे गणेश भक्तांचे लक्ष

लागले आहे. राज्य शासनाने पाडव्याच्या मुहर्तावर राज्यातील तीर्थक्षेत्रे सुरु करण्यास परवानगी दिल्यानंतर अष्टविनायक मंदिरही दर्शनाला खुली करण्यात आली. यानंतर एकही दिवस अष्टविनायक गणपती मंदिर बंद ठेवण्यात आले नव्हते. तसेच नुकत्याच झालेल्या माघी यात्रा उत्सवास प्रशासनाने परवानगी दिली होती.

अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने सर्वच क्षेत्री देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन रांग, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षक, मंडप आदींची तयारी सुरू आहे. मात्र अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने गर्दी झाल्यानंतर करोना फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजाराचा फैलाव टाळण्यासाठी अष्टविनायकापैकी प्रथम स्थळ असलेले मयुरेश्‍वर मंदिर बंद ठेवण्याचे परिपत्रक काढले जाणार असल्याची माहिती वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.

प्रशासनाकडून मंदिर बंद अथवा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय लवकर दिल्यास देवस्थान ट्रस्टचे अंगारकीनिमित्ताने करावी लागणारी उपाययोजना यावर होणारा खर्च टाळता येणार आहे. तसेच या चतुर्थीला व्यापारी व दुकानदार, हार, दुर्वा, पेढे आदी जादा माल घेत असल्याने त्यांचेही होणारे नुकसान टाळता येणार आहे.

वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी (दि.2) मार्च रोजी आहे. प्रशासनाने या चथुर्तीला मंदिर सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय दिल्यास चतुर्थीची तयारी करता येईल अथवा बंदबाबतचा लवकर निर्णय दिल्यास चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली असलेल्या थेऊर, मोरगांव, सिद्धटेक येथे होणाऱ्या गर्दीच्या अटकावासाठी व उपाययोजनेसाठी करावा लागणारा संभाव्य खर्च टाळता येईल.
– आनंद तांबे, विश्‍वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.