पुणे – पॉलीविनाइल क्लोराइड (पीव्हीसी) आणि प्लॅस्टिक पॉलिमरने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने तसेच पुनर्वापर करता येत नसल्याने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पीव्हीसीच्या फ्लेक्सवर छपाई चाकाचक येत असल्याने राजकीय मंडळींकडून मागणी होत असल्याने याचाच वापर अधिक होत असल्याचे समोर आले आहे. तर, शासकीय विभागही याचा वापर आपल्या जनजागृतीच्या जाहिरातींसाठी करीत असून याला आवर घालणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत गंभीर असल्याने केंद्र शासनाने सिंगल युज प्लॅस्टिकवर दि. 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, देशभर त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी 2022 मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने जाहिरातीसाठी पीव्हीसी जाहिरात फलक ज्यामध्ये प्रामुख्याने पॉलीविनाइल क्लोराइड (पीव्हीसी), प्लॅस्टिक पॉलिमरचा एक नॉन-बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे आणि जर ते जाळले तर डायऑक्सिन्ससारखे टॉझिक धूर सोडते, त्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही पुण्यासह सर्वच जिल्ह्यात जाहिरात फलकांसाठी या बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे.
मात्र,यावर कारवाई कोणी करायची, याबाबत शासकीय यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्याने या बंदी असलेल्या घातक पॉलीविनाइल क्लोराइड आणि प्लॅस्टिक पॉलिमरचा वापर सुरूच आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही तर काही अधिकाऱ्यांनी याबाबत काहीच माहित नसल्याचे थेट सांगितले.