पुणे – मनपा इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळांनी शिक्षण मंडळाकडे शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल दिला. मात्र, तो गहाळ झाला आहे. यामुळे शिक्षकांचे मानधन थकले आहे.
पालिकेने 15 जून 2022 ते 22 नोव्हेंबर 2022 पर्यंत दिवाळी सुट्टी वगळून दरमहा 15 हजार रुपये मानधनावर 132 शिक्षकांच्या नियुक्त्या आधी सहा महिन्यांसाठी केल्या. त्यानंतर सहा दिवसांचा सेवाखंड ठेवून 29 डिसेंबर 2022 ते 6 मे 2023 या कालावधीसाठी पुन्हा नियुक्त्या केल्या होत्या. शहरात महापालिकेच्या 50 इंग्रजी माध्यमाच्या प्राधमिक शाळा आहेत. यातील पाच शाळा अन्य खासगी संस्थांना चालवायला दिल्या आहेत. कंत्राटी शिक्षकांकडून 15 हजार रुपये अनामत रक्कम व 1 हजार रुपये विधी विभागाच्या काही प्रक्रियेसाठी घेण्यात आले होते. मानधन वेळेत मिळत नाही, काम जास्त व मानधन कमी, अन्य ठिकाणच्या शाळांमध्ये जास्तीचे मिळत असलेले मानधन यासह अन्य काही कारणास्तव 52 कंत्राटी शिक्षकांनी महापालिकेतील नोकरीही सोडली आहे. अखेर आता 80 शिक्षक शिल्लक
राहिले आहेत.
बायोमेट्रिक हजेरी अहवाल मिळत नसल्यामुळे 25 शिक्षकांचे जानेवारीचे मानधन रखडले आहे. शाळांकडून पुन्हा शिक्षकांची हजेरी मागवून घेण्यात आली आहे. थकीत मानधन अदा करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. 80 शिक्षकांचे एप्रिलचे मानधनही आठवडाभरात देऊ. शिक्षकांच्या सेवा समाप्तीनंतर महिनाभरात त्यांना अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे.
– दत्तात्रय फुले, अधीक्षक, मनपा शिक्षण मंडळ
महापलिकेने कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन लवकर देण्याची गरज आहे. महापालिकेने तुटपूंज्या मानधनावर शिक्षकांच्या हंगामी नियुक्त्या करण्याऐवजी कायमस्वरुपी पूर्ण वेळ शिक्षकांची भरती करावी. समान काम समान वेतन मिळायला हवे आहे. अनामत रक्कमही तत्काळ मिळावी, अशी मागणी पालिकेकडे केली आहे.
– सुनील खाडे, शिक्षक प्रतिनिधी