पॅरिस – सर्वच प्रकारचे प्रदूषण हे जगासाठी घातक ठरू पाहत आहे. त्यातही जलप्रदूषण हे जास्त घातक मानले जाते. त्याचा सर्वात मोठा फटका पृथ्वीवरील समुद्रांना आणि महासागरांना बसला आहे. ताज्या आकडेवारी प्रमाणे सध्या जगभरातील महासागरांमधील प्रदूषणाची पातळी सर्वोच्च झाली असून गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये जलप्रदूषणाचा वेग झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.
या नवीन अहवालातील माहितीप्रमाणे जगभरातील सर्व महासागरांच्या पृष्ठभागावर प्लास्टिकचे 170 ट्रिलियन तुकडे जमा झाले आहेत. 2005 नंतर या प्रक्रियेमध्ये जास्तच वाढ झाली आहे. महासागरांचे प्रदूषण करणाऱ्या या प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये मायक्रो प्लास्टिकचा समावेश जास्त आहे. ओपन एक्सेस जर्नल पीएलओएस या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले असून आगामी कालावधीमध्ये प्रदूषणाची पातळी अधिकच वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.
हे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यापूर्वी संशोधकांनी तब्बल 40 वर्षे संशोधन केले होते. त्यामध्ये 1979 ते 2019 या चाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये जगभरातील महासागरांच्या प्रदेशातील 11000 ठिकाणचे विविध नमुने गोळा करण्यात आले होते. 1990 ते 2005 या कालावधीमध्ये महासागरातील प्रदूषण नियंत्रणाखाली होते.पण 2005 नंतर त्याचा वेग वाढल्याचे या संशोधनात लक्षात आले. या काळात जगात सर्वत्र उत्पादन क्षेत्र विकसित झाल्याने त्याचा फटका महासागरांना बसला आणि प्लास्टिकचे तुकडे मोठ्या प्रमाणावर महासागरांमध्ये जमा झाले.
सध्या जगातील विविध महासागरांमध्ये जे प्लास्टिक आहे. त्याचे वजन 2.3 दशलक्ष टन असावे असा अंदाज आहे. या संशोधनामध्ये प्रामुख्याने उत्तर अटलांटिक दक्षिण पॅसिफिक आणि भारतीय क्षेत्रातील महासागरांचे संशोधन करण्यात आले.