लिचींग प्रकरणावरून राजकारण नको – नक्वी

मुंबई – देशात घडणाऱ्या लिंचींग प्रकरणाला जातीय अथवा धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण केले जाऊ नये अशी अपेक्षा अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली आहे. ते आज येथील हज हाऊसच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की जमावाकडून ठार मारले जाण्याचाप्रकार हा गुन्हेगारी स्वरूपाचा प्रकार आहे. त्याचा निषेधच केला पाहिजे. पण त्याचे राजकारण करणे योग्य नाही.

झारखंड मध्ये जयश्रीराम किंवा जय हनुमान म्हटले नाही म्हणून एका मुस्लिम युवकाला ठार मारण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्या प्रकाराविषयी संसदेतही ओरड झाली आहे. नक्वी म्हणाले की बहुसंख्याक हिंदु समाजातील सहिष्णुता आणि सलोखा हाच भारतीय लोकशाही आणि सेक्‍युलॅरिझमचा पाया आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सेक्‍युलर देश आहे. फाळणीनंतर पाकिस्तान हा इस्लामिक देश बनला पण या देशातील बहुसंख्याक हिंदुंनी सेक्‍युलर बनण्यालाच प्राधान्य दिले आहे ही बाबही ध्यानात ठेवावी लागेल. या देशातील वैविध्यामुळेच एकता साधली गेली आहे.

आज देशातील अल्पसंख्याकहीं अन्य समाजाबरोबर प्रगती करीत आहेत. त्यांना धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्य आहे. सर्वसमावेशक संस्कृतीमुळे देशातील ऐक्‍य आणि सलोखा टिकून राहिला आहे. त्यातून देशाने दहशतवादाचा पराभव केला आहे. दहशतवाद हा मानवतेचा आणि इस्लामचाहीं मोठा शत्रु आहे हे मुस्लिम समाजही ओळखून आहे असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.