पुणे – जिल्ह्यात तेरा तालुक्यांमध्ये एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत 94.5 टक्के पोलिओ लसीकरण पूर्ण झाले. तर, शहरात 79 टक्के लसीकरण झाले. उर्वरीत बालकांना पुढील पाच दिवसांत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात रविवारी (दि. 31) पोलिओ लसीकरण मोहीम घेण्यात आली. यासाठी पुणे जिल्ह्यात 4 लाख 81 हजार 617, तर जिल्हा रुग्णालयात 87 हजार 230 असे एकूण 5 लाख 68 हजार 847 लाभार्थी अपेक्षित होते. जिल्ह्यात 3 हजार 601 बूथ तयार केले होते. त्या ठिकाणी 8 हजार 744 कर्मचारी कार्यरत होते.
बूथवर 0 ते 5 तसेच पाच वर्षांपुढील बालके लसीकरणासाठी आले होते. त्यामध्ये पाच वर्षांखालील बालकांमध्ये 4 लाख 63 हजार 980, तर जिल्हा रुग्णालयात 73 हजार 528 असे एकूण 5 लाख 37 हजार 508 बालकांचा समावेश होता. एकूण अपेक्षित लाभार्थ्यांपैकी 4 लाख 69 हजार 443 एवढ्या बालकांना लसीकरण केले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती आणि वेल्हा तालुक्यांत शंभर टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले. त्या पाठोपाठ जुन्नरमध्ये 92 टक्के, तर अन्य तालुक्यांमध्ये सुमारे 96 ते 98 टक्के लसीकरण झाले. दरम्यान, पुणे शहरात 1 हजार 323 बूथवर 2 हजार 506 कर्मचारी कार्यरत होते.
3 लाख 8 हजार अपेक्षित बालके होते. बूथवर पाच वर्षांखालील 2 लाख 35 हजार 817, तर पाच वर्षांपुढील 6 हजार 147 असे 2 लाख 41 हजार 964 बालकांना लसीकरण केले. त्यामुळे एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत 79 टक्के लसीकरण केले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.