मंचर – मंचर पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाने वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या तरुणाला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी घडली.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हीडीओ एका सजग नागरिकाने सोशल मीडियावर टाकला आहे. हा व्हीडीओ पाहून अनेक नागरिकांनी पोलिसाच्या या अमानवी कृत्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावडेवाडी येथे एक तरुण नातेवाईक मित्रासमवेत वृद्ध आई-वडिलांना जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकलवरून जात असताना गावडेवाडी फाटा येथे पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित तरुणाची मोटरसायकल अडवून त्याला मारहाण केली.
संबंधित तरुण माझे आई-वडील शेतात काम करीत आहेत, त्यांना जेवणाचा डबा घेऊन चाललो आहे, असे सांगूनही पोलीस मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या पोलिसाने काठीने तरूणाला मारहाण केली. त्या पोलिसाचे समाधान न झाल्याने त तरुणाच्या थोबाडीत देखिल मारली. एवढे होऊनही संबंधित तरुण सॉरी म्हणूनही पोलिसाच्या हातापाया पडत होता.मात्र पोलीस त्याला मारतच होता. तो तरुण पोलिसाला आम्ही पण माणूस आहे, अशी विनवणी करत होता.
मात्र, पोलिसाने काही ऐकले नाही. हा व्हीडीओ सोशल मीडियावर एका सजग नागरिकाने टाकला आहे. हा व्हायरल झालेला व्हीडीओ पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित पोलिसाने केलेल्या मारहाणीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले आहे.