शिक्रापूर -पोलीस पाटील हा गावातील महत्वाचा घटक बनला आहे. पोलीस पाटलांना ग्रामपंचायतीमध्ये जागेसह साहित्य देखील उपलब्ध करुन देण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पोलीस पाटील हे गावातील महत्वाचे तसेच शासकीय स्तरातील पद आहे. मात्र पोलीस पाटील यांना स्वतंत्र जागा अथवा कार्यालय नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. सर्व पोलीस पाटील यांना ग्रामपंचायतीमध्ये जागा उपलब्ध करुन देत एक टेबल, दोन खुर्ची, एक कपाट असे साहित्य उपलब्ध करुन देऊन सदर साहित्यांचा खर्च ग्रामनिधी
तसेच पंधरावा वित्त आयोगातून प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देत सर्व ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत.