नगर महामार्गावरील पोलीस अधिकारी निरोप देताना झाले भावूक
शिरूर/शिक्रापूर (पुणे) – जिल्ह्यात सर्वसामान्यांबरोबरच आपल्या सहकाऱ्यांच्या मनात घर केलेल्या पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निरोप देताना पुणे-नगर महामार्गावरील सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आगळीवेगळी सलामी देत त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास निरोप दिला.
कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य नागरिक, महिलावर्ग यांना न्याय देणारे व प्रशासनात कडक शिस्त, गुन्हेगारांना तडीपार व मोकाखाली जेरबंद करणारे कर्तव्यदक्ष पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची कारकीर्द सर्वांना लक्षात राहण्याजोगी आहे. संदीप पाटील हे पुणे जिल्ह्यातील आपला कार्यकाळ पूर्ण करून गडचिरोली येथील नवीन पोस्टिंगच्या ठिकाणी पुणे-नगर महामार्गावरून जात होते.
लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव तसेच शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना विशेष सलामी देत सन्मान करण्यात आला. यावेळी लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, अधिकारी गणेश जगदाळे, बिरदेव काबुगडे व भगवान पालवे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी भावूक झाले होते.
यावेळी उपस्थित सर्व पोलिसांनी एका दमात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना सॅल्यूट मारून त्यांना निरोप दिला. तर संदीप पाटील यांनी देखील सर्वांना सेल्युट मारून सर्वांचे आभार मानले. यावेळी नकळत अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, त्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या आठवणींनी…
- अधीक्षक कार्यालयात विशेष मिरवणूक
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोली विशेष पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील पदभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे देत पुणे ग्रामीण दलाचा निरोप घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची फुलाने सजविलेल्या मोकळ्या गाडीतून मिरवणूक काढली होती. यावेळी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी भावूक झाले होते.