पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. वाहन जाळपोळीच्या ॲक्शन प्लॅननंतर आता गुन्हेगार वास्तव्यास असलेली १८ ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली आहे. परिमंडळ तीन, चार, पाच आणि दोनच्या हद्दीत हे सर्वाधीक स्पॉट आढळून आले आहेत. या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस कोम्बिंग ऑपरेशन राबवणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
यासाठी मागील काही दिवस गुन्हे शाखा स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने काम करीत होते. गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या परिसराचे मॅपिंग करून हे स्पॉट निश्चित केले आहेत. सध्या, बड्या गँग मोक्कामध्ये कारागृहात असल्यातरी त्यांचे काही नंबरकारी आणि उभरत्या गँग अस्तित्वात आहेत.
यामध्ये बेकायदा शस्त्र बाळगणे, अल्पवयीन गुन्हेगार, अवैध धंदेवाले, वाहनचोरी, अमली पदार्थ तस्करी, तडीपार, तोडफोड करणारी टोळकी, टायर, पेट्रोलचोरी, जबरी चोरी करणार्या गुन्हेगारांबरोबरच भुरट्या चोरट्यांचा समावेश आहे.
शोधण्यात आलेली ही १८ मोठी ठिकाणे पहिल्या टप्प्यातील आहेत. त्यानंतर दुसर्या टप्प्यात छोटी ठिकाणे शोधून, त्याबाबत उपायोजना करण्यात येणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे या अधिकार्यांचे या हॉटस्पॉट ऑपरेशनवर विशेष लक्ष असणार आहे.
अल्पवयीनच्या पालकांवर कारवाई…
गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पोलिसांसमोरील मोठे आव्हान असून, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी दुरगामी पाउले उचलण्यास सुरूवात केली आहे.
स्पॉट आयडेंटीफाय करताना पोलिसांनी या मुद्यांकडेही लक्ष केंद्रीत केले आहे. तोडफोड, जबरी चोरी, वाहनचोरी अशा गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. समुपेशनाबरोबरच पालकांवर कारवाईचाही बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. पालकांच्या दुर्लक्षामुळे अनेक मुले गुन्हेगारीकडे वळली आहेत.
परिमंडळ गुन्हेगार हॉटस्पॉट
परिमंडळ एक : ०२
परिमंडळ दोनः ०३
परिमंडळ तीनः ०४
परिमंडळ चारः ०५
परिमंडळ पाचः ०४