‘पीएमपीएमएल’ला मिळणार वाढीव विद्युतपुरवठा

पुणे – पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये लवकरच नव्याने इलेक्‍ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. याकरिता अधिक विद्युत पुरवठ्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएल आणि महावितरण प्रशासनामध्ये नुकतीच बैठक झाली. यामध्ये गरजेनुसार वाढीव विद्युतपुरवठा देण्याचे आश्‍वासन महावितरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

या बैठकीला पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, अभियंता सुनील बुरसे, विद्युत अभियंता प्रशांत कोळेकर, महावितरणचे सुनील पावडे, सचिन तालेवार आदी उपस्थित होते.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात सध्या 25 इलेक्‍ट्रिक बसेस धावत आहेत. लवकरच दाखल होणाऱ्या बसेसमुळे ही संख्या वाढणार आहे. यासाठी शहरातील भेकराईनगर आणि निगडी डेपोमध्ये चार्जिंग पॉईंट देण्यात आले आहेत. मात्र, बसेसची संख्या वाढल्यानंतर इतर काही डेपोंमध्ये चार्जिंग पाईंट करावे लागणार आहे. परिणामी वाढीव वीजपुरवठा लागणार असून सुमारे 22 किलोवॅटच्या ट्रान्सफॉर्मरची गरज आहे.

याबैठकीमध्ये आवश्‍यक असणारा वीजपुरवठा आणि याबाबतची प्रक्रिया, स्वस्तात वीज उपलब्ध करून देण्याची योजना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महावितरण प्रशासनाने पीएमपीएमएलला योग्य ती मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती पीएमपीएमएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.