18 एप्रिल रोजी “बस डे’ उपक्रमाचे आयोजन
वर्धापन दिनानिमित्त खेळांच्या स्पर्धा, चर्चासत्र
पुणे – प्रवासी आणि पीएमपीमधील कनेक्टिव्हिटी’ वाढावी आणि अधिक नागरिकांनी बस प्रवास करावा, यासाठी पीएमपी महामंडळ 18 एप्रिल रोजी बस डे’ साजरा करणार आहे. 19 एप्रिल रोजी पीएमपीचा वर्धापन दिन असतो. त्यानिमित्त प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम होणार आहेत.
या उपक्रमांबाबत पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी माहिती दिली. यावेळी सहव्यस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, जनरल मॅनेजर सुनील गवळी, मुख्य अभियंते सुनील बुरसे आदी उपस्थित होते.
दि. 14 ते 23 एप्रिलदरम्यान कर्मचाऱ्यांसाठी खेळाच्या स्पर्धा, महिलांसाठी खेळ, चर्चासत्र, वेबिनार या उपक्रम होतील. बस डे’ उपक्रमाचे उद्घाटन डेक्कन स्थानकात होणार आहे. तर एक्झिबिशन ऑन व्हील्स’ उपक्रमांतर्गत डेक्कन, स्वारगेट, पुणे स्टेशन, कात्रज, पिंपरी, निगडी आदी महत्त्वाच्या ठिकाणी बससेवेची माहिती देण्यात येणार आहे. यासह बस डे’ला प्रवाशांना तिकीटदरात अंशतः सवलत देण्याबाबत विचार सुरू आहे. प्रवासी संख्या आणि आर्थिक अभ्यास करुन लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
“शून्य डीझेल बसेस’
पर्यावरणपूरक वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या ताफ्यात सीएनजी आणि ई-बसेस वाढवण्यात येत आहेत. सध्या ताफ्यात 40 डीझेल बसेस असून, टप्प्याटप्प्याने या बसेस बाद करण्यात येतील. याबाबत शून्य डीझेल बसेस’ असे उद्दिष्ट असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
हे पासेस बंद होणार
येत्या काळात एसटीच्या दरात ग्रामीण भागात पीएमपी सेवा देण्यात येणार आहे. लांब पल्ल्यांच्या मार्गांवरील 70 रुपयांचा दैनंदिन पास आणि 1,400 रुपयांचा मासिक पास 1 एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. तर काही मार्गांवरील सेवा एसटी बंद असल्याने सुरू केल्या असून, एसटी सेवा सुरळीत झाल्यानंतर काही मार्ग बंद केले जाणार आहे.