प्रशासनाने दवाखान्यांची बिले थकविली; इंटकचा आरोप
पुणे – पीएमपी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी “पीएमपीएमएल’ची वैद्यकीय अंशदायी योजना आहे. मात्र, प्रशासनाने शहरातील दवाखान्यांची बिले थकविल्यामुळे रुग्णालय प्रशासन पीएमपी कामगारांना सुविधा देण्यास नकार देत असल्याचा आरोप पीएमटी कामगार संघटनने (इंटक) केला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात “पीएमपीएमएल’चे दहा हजार तर, सेवानिवृत्त सुमारे दीड हजार कर्मचारी आहेत. अंशदायी योजनेत 50 रुग्णालये आहेत. मात्र, या रुग्णालयांची बिले थकविल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर उपचार केले जात नसल्याने कर्मचाऱ्यांची परवड होत आहे. अंशदायी योजनेकरिता कामगारांच्या पगारातून एक टक्का रक्कम कपात होत आहे. मात्र, पीएमपी प्रशासनाने त्यांच्या हिश्श्यातील साडेचार टक्के रक्कम पालिकेकडे जमा करणे क्रमप्राप्त असताना प्रशासन फक्त 300 रूपये भरते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी रक्कम कमी पडत असल्याची तक्रार इंटककडून करण्यात आली आहे.
प्रशासनाने शहरातील रुग्णालयांची बिले थकविल्याने संबंधित रुग्णालयांची दारे कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी बंद झाली आहेत. वैद्यकीय योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठराविक रक्कम कपात करूनही उपचारासाठी नकार दिला जात आहे. कर्मचाऱ्यांचा दोष नसतानाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने थकीत बिले भरण्याची आवश्यकता आहे.
– राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमटी कामगार संघटना (इंटक)
या योजनेसाठी पीएमपीएल प्रशासन दर तीन महिन्यांनी पुणे महापालिकेला दीड कोटी रुपये देते. यामधील काही रुग्णालयांची बिले थकली असल्यास सदर रुग्णालये उपचारासाठी टाळाटाळ करत असतीत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाने थकीत बिले भरण्याची आवश्यकता आहे.
– अजय चारठाणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल